NDA चा घटक पक्ष राहिलेल्या माजी खासदाराने केले केंद्र सरकारवर गंभीर आरोप !

सांगली ।। केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत असून राजकीय वर्तुळामध्ये केंद्र सरकारला आरोप – प्रत्यारोपाला तोंड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी (माजी खासदार) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. शेट्टी म्हणाले, ‘केंद्र सरकारने लादलेल्या नव्या कृषी विधेयकांना भाजपशासित राज्यांचाही विरोध आहे.

भाजप शासित राज्यातील शेतकरी गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर) ला आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले होते. मात्र, सरकारने त्यांना डांबून ठेवले आहे’. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि. ८ डिसेंबर) रोजी होणाऱ्या भारत बंद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी असेल, असे शेट्टी यांनी सांगितले. आज सांगली येथील पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना या संदर्भात माहिती दिली.

यावेळी शेतकरी आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडताना राजू शेट्टी म्हणाले, ‘कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानी शिरल्याचा अपप्रचार करून प्रांतवाद आणि जातीयवाद पसरवला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याने भाजपशासित राज्यामधील शेतकरीही आंदोलनात सहभागी होत आहेत.

भाजपशासित राज्यातील लोक आंदोलनात गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर) रोजी सहभागी व्हायला निघाले होते. परंतु, सरकारने त्यांना डांबून ठेवले. अनेक नेत्यांना दिल्लीपर्यंत जाऊ दिले नाही. अद्याप आंदोलनाची तीव्रता कमी झाली नसल्याने शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारने रस्त्यात खंदक खोदली. शेतकरी अतिरेकी आहेत का? या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. जागर करूनही केंद्र सरकार जागे होत नसून मंगळवार (दि. ८ डिसेंबर) रोजी आम्ही भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात केवळ शेतकऱ्यांनीच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही सहभागी झाले पाहिजे असे आवाहन शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

litsbros

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here