पुणे : ‘मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं… तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं…’ अशा गीतांनी अवघा महाराष्ट्र जागवणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील प्रसिध्द गायिका कडूबाई खरात यांना विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने “सावित्रीबाई फुले सन्मान २०२१” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करुन तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कडूबाई खरात यांचा परिचय
औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणा-या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारे गाणे सर्वत्र पसरले. ते आज गावागावांत घुमू लागले आहे. कडुबाई खरात यांनी गायलेल्या भिमागितानं महाराष्ट्रात एक क्रांती घडवली. वडिलांपासून घरात सुरु असलेलं गाणं कडूबाई यांच्या गोड गळ्यात आणखी खुललं आणि या गाण्यानंच कडूबाई यांच्या जगण्याला एक आकार दिला. कडूबाई अबला म्हणून नव्हे; तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू लागल्या. कष्टानं मिळालेली भाकरीच खाणार, अशी जिद्द घेऊन जगणा-या कडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार त्यांनी घरोघरी पोहचवला.