नवी दिल्ली ।। दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप थांबत नसून आज आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला सर्व क्षेत्रातून मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला जात असतानाच सनी देओल (खासदार, भाजपा तथा अभिनेता, बॉलिवूड) यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली.
आपले मत व्यक्त करताना देओल म्हणाले, ‘मी माझ्या पक्षासोबत आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमी शेतकऱ्यांसोबत असेन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे आणि मला विश्वास आहे की सरकार त्यांच्यासोबत चर्चा करुन योग्य निकालापर्यंत पोहोचेल. अशा आशयाच्या ट्विटमुळे सनी देओल नेमके कोणाच्या बाजूने आहेत याबद्दल प्रचंड संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, देओल यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.